Type Here to Get Search Results !

हमाली केली, आमदाराची मुलगी पळवली, कमी वयात सगळं मिळवलं, प्रसाद लाड यांचं चर्चेतलं भाषण

मुंबई : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) दहा सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने ते आज निवृत्त झाले. यामध्ये (), प्रवीण दरेकर (Pravin Darekar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांसारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात सदस्यांसहित इतरही नेत्यांनी फटकेबाजी केली. यामध्ये आमदार प्रसाद लाड यांचं भाषण सर्वाधिक गाजलं. बालपणीचा संघर्ष, महाविद्यालयीन जीवनातलं प्रेम प्रकरण, नंतर गरिबीमुळे केलेली हमाली, पुढे व्यवसायात झालेली भरभराट, राजकारणात एकामागोमाग एक मिळालेली पदं अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख प्रसाद लाड यांनी आपल्या भाषणात केला. एकंदर प्रसाद लाड यांचं या टर्ममधील आजचं विधान परिषदेतलं भाषण लक्षवेधी आणि टाळ्या मिळवणारं होतं. "परळच्या दहा बाय दहाच्या खोलीत बालपण गेलं. वडील ७०-८० च्या दशकातले रावते-देसाईंच्या बरोबरीचे शिवसैनिक होते. त्यामुळे राजकारणाचा अंगभूत गुण माझ्यात आला. पण घरची गरिबी असल्यामुळे पडेल ते काम करावं लागलं. दरम्यान १९ वर्षांचा असताना मी पळून जाऊन लग्न केलं. आमदार बाबुराव भापसे यांची मुलीला पळवून नेऊन मी विवाह केला. बाबुराव भापसे दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य तसंच एक वेळा विधानसभा सदस्य होते. त्याकाळी त्यांची मुलगी पळवून न्यायची, ही फार मोठी गोष्ट होती. पण ते धाडस मी केलं, तिथूनच धाडस कसं करायचं हे शिकलो", असं प्रसाद लाड म्हणाले. "माझे सासरे आमदार बाबुराव भापसेंचा रुबाब बघून मी तेव्हाच ठरवलं एकदा तरी आपण आमदार व्हायचं. पोलिस सलाम करतात, कार्यकर्ते दरवाजात असतात, सामाजिक बांधिलकीतून काम होतं. मग महाविद्यालयीन जीवनात नेतेगिरी करत होतो. पुढे संधी मिळत गेली. जयंत पाटलांमुळे वयाच्या ३१ व्या वर्षी सिद्धीविनायक न्यासाच्या विश्वस्तपदी काम करण्याची संधी मिळाली. तेव्हाच्या काळात ही फार मोठी गोष्ट होती. कारण सगळी ज्येष्ठ मंडळी त्याकाळी विश्वस्त मंडळावर होऊन गेली होती." "शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी वेळोवेळी संधी दिली, असं सांगताना ही नावं मी आज मुद्दामून घेणार असल्याचं सांगायला प्रसाद लाड विसरले नाहीत. पुढे मुंबई म्हाडाचा सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वयाच्या ४० व्या वर्षी ही संधी राष्ट्रवादीने दिली. मुंबई म्हाडाचं सभापतीपद म्हणजे मुंबईतल्या राजकारणातलं महत्त्वाचं पद. पण ती भूषविण्याची मला संधी मिळाली. राज्यमंत्र्यांचा दर्जा होता. लाल दिव्याची गाडी होती. हे सगळं वयाच्या ४० व्या वर्षी मिळालं. एकंदरित खूप लवकर-लवकर मला गोष्टी मिळत गेल्या. आता तर मुलीचं लग्न झाल्याने सासराही झालो आहे." "मला खरं तर पूर्ण सहा वर्षे सभागृहात काम करता आलं नाही. पावणे पाच-पाच वर्षांचा कार्यकाळ मला मिळाला. परंतु ही पाच वर्षे कधी आणि कशी गेली, हे काही मला कळलं नाही. अडीज वर्षे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, अडीज वर्षे विरोधात काम केलं. विरोधकात असताना संसदीय आयुधांचा वापर कसा करायचा, हे अधिक बारकाईने शिकलो. पण म्हणून कायम मला विरोधातच काम करायचं आहे, असं नाही", असा टोलाही प्रसाद लाड यांनी लगावला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0Ka6Vu4
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

ADVERTISEMENT