
: वेलिंग्टन : आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत भारताला शनिवारी (१९ मार्च) ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. मागील सामन्यात भारतीय संघाला गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध चार विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा पराभव करायचा असेल, तर शफाली वर्माचा संघात समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार आणि सध्या विश्वचषकातील प्रमुख समालोचक नासीर हुसेन यांनी व्यक्त केले. खराब फॉर्ममुळे शफाली प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सामने जिंकले आहेत. भारताचा सामना १९ मार्चला ईडन पार्कवर ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हुसेन म्हणाले की, ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी चांगले खेळणे पुरेसे नाही आणि शफाली वर्मा भारताला या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी आवश्यक असलेली विलक्षण ऊर्जा देऊ शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यानच हुसेन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, 'मी शफाली वर्मासोबत जाईन. ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी फक्त चांगले खेळणे पुरेसे नाही. तुमच्याकडे विलक्षण असं काहीतरी पाहिजे आणि शफाली तुम्हाला ती विलक्षण ऊर्जा देऊ शकते. पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भारताची सलामीवीर शफाली वर्मा शून्यावर बाद झाली होती. त्यानंतर तिला न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांसाठी अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेले नाही. भारताची माजी कर्णधार अंजुम चोप्रानेही शफालीचे कौतुक केले आहे. ती म्हणाली की, 'भारतीय संघाने हे लक्षात ठेवायला हवे की, गेल्या वर्षी शफालीने ऑस्ट्रेलियाची २६ सामन्यांची विजयी मालिका खंडित केली होती.' भारताने आतापर्यंत या विश्वचषकात दोन सामने जिंकले आहेत, तर त्यांना न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. यापुढे आता भारताचे तीन सामने होणार आहे. भारताला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघांबरोबर दोन हात करायचे आहेत. या तीन सामन्यांवर आता भारतीय संघाचे विश्वचषकातील भवितव्य अवलंबून असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zNRpDm9
via IFTTT