
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर जगभरातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. जगभरातील क्रिकेटपटू त्याच्याशी निगडित आपल्या आठवणी शेअर करत आहेत. भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेनेही वॉर्नसोबतच्या आठवणींवर प्रकाश टाकला आहे. कुंबळे म्हणाला की, एखादा खेळाडू जर शेन वॉर्नचा मित्र असेल, तर ऑस्ट्रेलियन खेळाडू त्या खेळाडूविरोधात आक्रमक वृत्ती ठेवत नसत. मी जेव्हा फलंदाजीला जायचो, तेव्हा कांगारू संघाचे खेळाडू माझ्याशी वाद घालत नसत, कारण मी आणि चांगले मित्र होतो. स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना कुंबळे म्हणाला, 'ही गोष्ट एक मोठे गुपित आहे. शेन वॉर्नचा मित्र असलेल्या क्रिकेटपटूना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कधीही त्रास दिला नाही. त्यामुळे जेव्हा एखादा खेळाडू फलंदाजीला जातो आणि तो शेन वॉर्नचा चांगला मित्र असेल, तर ऑस्ट्रेलियन खेळाडू कधीच त्या खेळाडूला लक्ष्य बनवत नसत. तो वॉर्न होता. तो आपल्या मित्रांची अशी काळजी घेत असे. वॉर्नच्या मित्रांना अशा प्रकारे विशेष वर्तणूकही मिळायची.' अनिल कुंबळेने पुढे सांगितले की, 'शेन वॉर्नला नेहमीच भारताविरुद्ध चांगली कामगिरी करायची असे. १९९८ ची मालिका ही सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न यांच्यात रंगलेली मालिका होती. भारताविरुद्धची त्याची चांगली कामगिरी त्याला आणखीनच मोठे करते. त्याला नेहमीच भारताविरुद्ध चांगली कामगिरी करायची होती, कारण आपण फिरकी गोलंदाजीचे चांगले खेळाडू आहोत. पहिल्या डावात वॉर्न सचिनवर भारी पडला, पण नंतर सचिनने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली.' शेन वॉर्नचे शुक्रवारी थायलंडमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्न हा आपल्या मित्रांबरोबर थायलंडला गेला होता. तिथे वॉर्न क्रिकेटचा सामना पाहत असताना त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर वॉर्न बेशुद्ध पडला. वॉर्नच्या मित्रांनी जेव्हा त्याला पाहिले तेव्हा तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता. पण वॉर्नच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा शर्थीचे प्रयत्न केले, पण यामध्ये त्यांना यश आले नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/04gBnC2
via IFTTT